
चिपळूण प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जिल्हा बौद्धजन महासंघाचे उपाध्यक्ष व गुहागर तालुका बौद्धजन सहकारी संघाचे विद्यमान अध्यक्ष सुरेश सावंत यांची निवड झाल्याबद्दल बौद्धजन महासंघाच्या वतीने आज त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा बौद्धजन महासंघ रत्नागिरी (ग्रामीण) व मुंबई यांची संयुक्त सभा चिपळूण येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन या ठिकाणी महासंघाचे ग्रामीण अध्यक्ष प्रीतम रुके (दापोली) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला महासंघाचे सरचिटणीस संदेश पवार (चिपळूण), दापोली तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे उपसभापती शरद जाधव, उपाध्यक्ष निवास जाधव, गुहागर तालुका बौद्धजन सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश सावंत, एम डी मोहिते, मयूर मोहिते, संगमेश्वर तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे अध्यक्ष रवींद्र गमरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभेच्या प्रारंभी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आले. त्यावेळी सहकार क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचे योगदान देणारे सामाजिक राजकीय कार्यकर्ते सुरेश सावंत (गुहागर) यांचा यावेळी महासंघाचे अध्यक्ष प्रीतम रुके, सरचिटणीस संदेश पवार व अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या निवडीबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आले. तसेच याप्रसंगी दापोली बौद्ध समाज सेवा संघाच्या उपसभापतीपदी शरद जाधव व खजिनदारपदी निवास जाधव यांची नव्याने निवड झाल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.